Wednesday, September 5, 2012 0 comments

सागर जैसी ऑखोंवाली.. ये तो बता तेरा नाम है क्या..

तुने दिवाना दिल को बनाया.. इस दिल पर इल्जाम है क्या..
सागर जैसी ऑखोंवाली.. ये तो बता तेरा नाम है क्या..

हेच ते गाणं आज मी दिवसभर गुणगुणत होतो. सालाबादाप्रमाणे आजही भल्यापहाटेचे, ८ वाजताचे लेक्चर रद्द झाले. चरफडतच सगळे बाहेरच्या कट्यावर येऊन बसलो आणि तुला येताना पाहीले.

सकाळची सुर्याची सोनेरी किरणे तुझ्या हायलाईट केलेल्या केसांना चमकवत होती. तुझा तो पांढरा शर्ट आणि त्यावरची केशरी, लाल रंगाची फुलं तुझ्या कॉम्लेक्शनला मस्त सुट होतं होते. खांद्यावरुन कमरेपर्यंत आलेली तुझी स्लिंग बॅग, त्याला लावलेले हार्ट्स, घुंगरु, रंगीत रिबीन्स आणि इतर क्लस्टर्स तुझ्या कलरफुल पर्सनॅलीटीला सुट करत होते...

धक धक... धक धक... धक धक...

हृदयाची धडधड इतकी वाढली होती की कुणाला ऐकु जाईल की काय अशी भिती वाटु लागली.

मी टक लावुन तुझ्याकडे पहात होतो. कालच्या प्रसंगाने मला थोडीफार का होईना तुमच्या क्लासमध्ये प्रसिध्दी मिळाली होती त्यामुळे तु मला ओळखशील, नशीब बलवत्तर असेल तर ओळख सुध्दा देशील असे वाटत होते.

परंतु हाय रे दुर्दैव, तु माझ्याकडे पाहीले सुध्दा नाहीस.... हसणे तर दुर यार.. पण तु मला पाहीलेसही नाहीस... :-(

तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी ओळख व्हावी.. अगदी शिळोप्याच्या गप्पा नाही पण निदान कमीत कमी हाय हॅलो तरी... इतकी दुर्दम्य इच्छा मनामध्ये येत होती की मला स्वस्थ बसवेना.

मी (मित्रांना) : यार खुप बोअर होतंय, सकाळी सकाळी मस्त मुड होता अभ्यासाचा, आणि लेक्चर कॅन्सल
सिध्दार्थ : हा ना यार... सकाळी लवकर उठुन यावं तर अशी नाटकं..
मी : दुसर्‍या क्लासला बसायचं का?
शंतनु : ए गपे यार.. त्यापेक्षा चल कॅन्टन ला जाऊ, हादडू जरा आणि शनिवारचा ट्रेकपण प्लॅन करु..
मी : अरे शनिवारी जोश्याचे लेक्चर आहे..
शंतनु : सोड रे.. काय लेक्चर लेक्चर.. नेटवर सगळ्या नोट्स मिळतील..
मी : एवढं करण्यापेक्षा आत्ता दुसर्‍या क्लासला जोश्याचेच लेक्चर आहे ते करु ना अ‍ॅटेंड.. म्हणजे मग शनिवारचे बुडले तरी चालेल..

सिध्दार्थ : मेक्स सेन्स.. चल यार बसु.. इथं उगाच टाईमपास होतोय.

बाकी कोणी तयार नव्हतं.. बट हु केअर्स.. मी आणि सिध्दार्थ दोघं जणं गेलो जोश्याच्या क्लासला. जाईपर्यंत क्लास सुरु झाला होता. मी पट्कन एक धावती नजर टाकली पण इतक्या गर्दीत ‘ती’ नक्की कुठं बसली होती काही दिसलं नाही.

चरफडतच स्टेप्स चढत एकदम मागच्या बेंचवर जाऊन बसलो जेथुन मला क्लासमधले सगळेजण दिसत होते. क्लासमध्ये लक्षच नव्हतं गं माझं, माझी नजर फक्त तुलाच शोधत होती.. सगळीकडुन दोन-तिनदा नजर फिरवली पण तु कुठ्ठंच नव्हतीस...

हे असं कसं झालं.. मी स्वतः तुला कॉलेजमध्ये येताना पाहीलं होतं, मग क्लासमध्ये कशी नाहीस तु?

सिध्दार्थ माझी चुळबुळ बघत होता, शेवटी तो म्हणालाच.."काय रे, काय झालं?"

पण त्याला काय सांगणार काय झालं! माझाच मुर्खपणा होता. तु कॉलेजमध्ये आलीस म्हणजे क्लासला बसशीलच कश्यावरुन? कदाचीत लॅबब्ररी मध्ये असशील, कदाचीत लॅबमध्ये.....

श्शी.. इतका मुड गेला माझा...... आणि त्यावर जोश्याचे लेक्चर मॅरेथॉन टाईम- ३ तास चालले. तिन तास!! आयुष्यात इतका हतबल कधी झालो नव्हतो मी.. तुझ्यामुळे.. फक्त तुझ्यामुळे..

कोण आहेस तु? नाव तरी काय तुझं??

तुझा सिक्रेट अ‍ॅडमायर - तरुण
Saturday, September 1, 2012 0 comments

नैना ठग लेंगे...

'तो' दिवस, उभ्या आयुष्यात मी कध्धीच विसरू शकणार नाही.. तुझी शप्पथ.....

तीन दिवसात गोव्याला धावती भेट देऊन आमचा कंपू परतला होता. गोव्यात केलेली मज्जा बाकी सगळ्यांना ऐकवायची आणि फोटो दाखवून जळवायचे ह्या आनंदी विचारातच मी कॉलेजला आलो होतो, पण हाय रे दुर्दैव.. आल्या आल्या कानावर बातमी पडली `मराठे'ने पोइंटर्स संपवले. पायाखालची वाळूच सरकली. जे संगणकातील जाणकार आहेत त्यांना पोइंटर्स किती महत्वाचे असतात आणि समजायला किती कठीण ह्याची कल्पना असेलच आणि नेमके आमचा ग्रुप दांडी मारून गोव्यात कल्ला करत असतानाच मराठेला पोइंटर्स घ्यायला वेळ मिळाला...:-(

नशीब बलवत्तर होते म्हणून वाचलो. सरांकडून कळले कि दुसऱ्या डिविजन मध्ये आजून होयचे आहे. एक मोठ्ठा हुश्श करून सुटकेचा निश्वास टाकला खरा .. पण तो तेवढ्यापुरताच होता, कारण पुढे काय होणार होते हे थोडे न मला माहित होते!


दुसऱ्या दिवशी आमच्या कंपूबरोबर मराठेच्या लेक्चरला दुसऱ्या वर्गात आलो. खर तर आम्ही सगळे आमच्याच धुंदीत असणारे. आमचे कॉलेज चे जग आमच्या पुरतेच मर्यादित होते त्यामुळे बाकी इतर कुणाशी आमच्या ओळखी असण्याचा फारसा संबंध नव्हता.

अर्थात म्हणून काय शांत बसायचे का? शिवाय लेक्चरच्या सुरुवातीचा बराचसा भाग आमच्या वर्गात आधीच कव्हर झाला होता त्यामुळे पॉईंटर्स सुरु होईपर्यंत लक्ष नाही दिले तरीही चालण्यासारखे होते. शिवाय मराठे सरांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आमच्या टवाळक्यांकडे सर नकळतच दुर्लक्ष करत होते.

पहीला सेक्शन संपत आला आणि सरांनी नेहमीच्या गाठोड्यातील प्रश्न विचारायला सुरुवात केली. आमच्या कंपुमध्ये त्यातल्या त्यात मी हुशार असल्याने अर्थात उत्तर द्यायची जबाबदारी सर्वस्वी माझी होती आणि त्यास मी पुरेपुर जागत होतो. वर्गातील बाकीचे अर्थातच अचंबीत होऊन माझ्याकडे बघत होते आणि सरांनी अचानकच एक गुगली प्रश्न टाकला. मी फारसा विचार न करता उत्तर देऊन टाकले आणि सरांच्या चेहर्‍यावर एक छद्मी हास्य पसरले.

"गोव्याची फेणी उतरली नाही का अजुन?", अनपेक्षीतपणे सरांनी प्रश्न केला आणि वर्गात एकच हशा पसरला.

मी खजील चेहर्‍याने वर्गातुन माझी नजर फिरवत होतो आणि अचानक माझी नजर दुसर्‍या बेंच वर बसलेल्या तुझ्यावर पडली.  बस्स.. हाच तो क्षण जेथुन माझ्या आयुष्यात तु आलीस. काही गरज होती का तुला मागे वळुन बघायची? काही गरज होती का तुला आपल्या केसांना सांभाळत कानावरुन मागे सरकवायची? काय गरज होती तुला ते मधाळ हास्य करण्याची? कोणी हक्क दिला तुला माझं काळीज असं नकळत स्वतःचं करुन घेण्याची?

का? का? का?

तुझी आणि माझी काही क्षणांसाठी झालेली नजरानजर काळजाला भगदाडं पाडुन गेली. पुढचा पुर्ण तास माझं लक्षच नव्हते. नजर फिरुन फिरुन तुझ्या पाठमोर्‍या आकृतीकडेच जात होती.

कोण होतीस तु? इतके दिवस मी तुला कधीच कसं नाही पाहीलं? असं नाही की कॉलेजमध्ये सुंदर मुली नव्हत्या. पण तुझ्याकडे बघीतल्यावर जसं वाटलं तसं कुणाच्याच बाबतीत का नाही कधी वाटलं? का मला असं वाटलं की मी तुला खुप आधीपासुन ओळखतोय? का तुझ्याशी पुन्हा पुन्हा नजरानजर व्हावी अशी हुरहुर लागुन राहीली? मराठे सरांच लेक्चर असुनही का आज माझं दुर्लक्ष होते आहे?
*****************

मी ह्याला प्रेम वगैरे नक्कीच म्हणणार नाही. बेसीकली ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट’ वगैरे तत्वांवर माझा विश्वास नाही. परंतु ह्या अनामीक ओढेचं काय? असं ऑल ऑफ अ सडन तुझ्याबद्दल माझं मन का विचार करु लागलं? काहीही ओळख पाळख नसताना, तुला आधी कधीही पाहीलेले नसताना?

वर्गातुन बाहेर पडलो तेंव्हा नकळत मनामध्ये एक गाणं तरळत होतं...

"जांगते जादु फ़ुकेंगे रे.. जागते जागते जादु..
जांगते जादु फ़ुकेंगे रे..निंदे बंजर कर देंगे..
नैना ठग लेंगे....
नैना ठग लेंगे ठग लेंगे... नैना ठग लेंगे........"


Thursday, August 30, 2012 0 comments

वेड्या मना...

वेड्या मना.. .काय लिहू ह्या ब्लॉग बद्दल? हा ब्लॉग सुरु करणे हाच खरं तर माझ्या मनाचा एक वेडेपणा आहे. पण मी हतबल आहे.. तसं पाहीलं तर फक्त एकच आठवडा झाला तुला बघून. पण ‘त्या’ दिवसापासुन मी माझा राहीलोच नाही. कस्तुरीच्या वासानं ‘कस्तुरी मृग’ कसं सैरभैर होऊन धावत सुटतं, अगद्दी तस्सच झालंय माझं. तुला पाहील्यापासुन वेडा झालोय, बेभान झालोय. माझा माझ्या मनावर, माझ्या नजरेवर ताबाच राहीलेला नाही. सतत ते तुझ्याच कडे धावतं आहे.

तसा मी अंतर्मुख, फारसा न बोलणारा, स्वतःच्याच विश्वात रमणारा. पण तुला पाहील्यापासुन माझ्या मनाला अचानक अंकुर फुटले. मनामध्ये विचारांची, शब्दांची गर्दी होऊ लागली. इतकी गर्दी की हे शब्द बाहेर नाही पडले तर उर फुटुन बाहेर पडतील की काय असे वाटु लागले आहे. आणि म्हणुनच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आज ह्या ब्लॉगचा आधार घेऊ पहात आहे. मला माहीत आहे ह्या कुबड्या मला कुठपर्यंत तारतील हा प्रश्न आहे.. पण तरीही.. तरीही लंगडत लंगडत का होईना माझ्या भावना इथे मांडणार आहे.

प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त तुझाच विचार. आज हा ब्लॉग बनवायला बसलो आणि डिझाईनसाठी इतकी शोधाशोध केली. पण कुठलेही टेम्प्लेट तुझ्या सौदर्यापुढे फिक्केच वाटले. मग विचार केला, ब्लॉगला रंग-संगती हवीच कश्याला. तुझ्या प्रेमाचे रंगच शब्दामधुन इतके छान उतरणार आहेत की ब्लॉगचे रंग हवेतच कश्याला.. हो ना?

वाचकवर्गाला ह्या तरल भावना, त्यातील उत्कंठा, त्यात तुझ्याविषयी तुडुंब भरलेले प्रेम आणि इतरही बरेच काही वाचायला आवडेल अशी आशा करतो...

चला तर मग सुरुवात करूयात अजून एका प्रेम-दुनियेची..



तुझाच..
तरुण

खर तर तुझाच म्हणायचं की नाही? खूप विचार केला यावर.. मी लाख म्हणेन मी तुझा आहे पण तू करशील का हे मान्य? मला वाटते ह्याचे उत्तर माझ्याकडे नाहीये.. सो ते येणारा काळच ठरवेल. फक्त माझ्याबद्दल विचार केला तर मी नक्कीच तुझाच आहे.. त्या दिवशीच तुझाच झालोय...


 
;